लेखिकेची संपुर्ण माहिती इथे पहा

Monday, August 10, 2009

नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही

0 comments

नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही मूळ लेखक : हरिशंकर परसाई Harishankar Parsai अनुवाद : उज्ज्वला केळकर Ujjwala Kelkar नवीन वर्ष माझ्यासाठी शुभेच्छा असलेल्या भेटकार्डांचा नॉट पेड लिफाफा घेऊन अवतरलं. राजकारण्यांसाठी ते मतपेट्या घेऊन आलं होतं. दोन्हीही नॉट पेडच! मला शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी दहा रुपये खर्च करावे लागले. राजकारण्यांना खूपच "नॉट पेड' चार्ज चुकवावा लागेल.माझ्या आसपास "लोकशाही वाचवा...प्रजातंत्र वाचवा...घटना वाचवा...' अशा घोषणा दिल्या जाताहेत. लोकशाही वाचवण्यासाठी इतके लोक उभे राहिले आहेत, की त्यामुळेच लोकशाही वाचणं मुश्कील वाटू लागलंय. लोकशाही वाचण्यापूर्वी पहिला प्रश्न मनात येतो, "कुणासाठी बरं वाचवायची ही लोकशाही?' लोकशाही वाचली आणि नुसतीच पडून राहिली, तर ती काय कामाची? परसातली भाजी मोकाट गुरा-ढोरांपासून वाचवायची ती कशासाठी? उभ्या उभ्या जळून जाण्यासाठी? नाही नाही, मुळीच नाही! भाजी राखणारा भाजी शिजवून खातो हे खरं! पण आता खाणारे इतके जास्त झालेत, की लोकशाहीच्या वाटणीसाठीच यापुढे भांडणं होत राहणार.तरीही एक प्रश्न उरतोच : लोकशाही वाचणार कशी? कोणतं इंजक्शन उपयुक्त ठरेल, परिणामकारक-प्रभावी ठरेल? सतत कुठली ना कुठली निवडणूक लढवणाऱ्या एका निवडणूकफेम नेत्याला मी म्हटलं, ""भाऊसाहेब, आईच्या पोटात शिरल्यापासून आपण राजकारणात आहात! सांगा ना, लोकशाही कशामुळे वाचेल? कुणी म्हणतं, समाजवादामुळे लोकशाही वाचेल. कुणी म्हणतं, समाजवादामुळे लोकशाही मरेल. कुणी म्हणतं, गरिबी हटल्याशिवाय प्रजातंत्र आणता येणार नाही. कुणी म्हणतं, गरिबी हटवणं म्हणजे हुकुमशाही आणणं. कुणी म्हणतं, अमुकतमुक नेताच लोकशाही वाचवू शकेल, तर दुसरं कुणी म्हणतं, तो नेता तर लोकशाही नष्ट करण्याच्या मागे लागलाय. आपण सांगा, लोकशाही कशी वाचेल?''भाऊसाहेब म्हणाले, ""या सगळ्या शंभर गोष्टींचं एक सूत्र मी तुला सांगतो.''""अं...ते कोणतं?'' मी भाविक चेहरा धारण करून ऐकू लागलो.""आपण वाचलो-की लोकशाही वाचेल. आपण जगलो- वाचलो तर दुनिया वाचेल. मी निवडून आलो तर मी नक्कीच लोकशाही वाचवेन...बरं, निघू मी? तिकिटासाठी प्रयत्न करायचेत...''मला वाटू लागलं, की आपणही निवडणूक लढवावी आणि लोकशाही वाचवावी. जेव्हा लोकशाहीची भाजी शिजेल तेव्हा आपल्याही वाटणीला एक प्लेट येईल. जे गेली कित्येक वर्षं लोकशाहीची भाजी खाताहेत ते म्हणताहेत, ""मोठी स्वादिष्ट लागते ही भाजी!'' लोकशाहीच्या भाजीला जी लोकांची साल चिकटली आहे ती सोलून टाका. मग त्या तंत्राला शिजवा. आदर्शांचा मसाला आणि कागदी कार्यक्रमांचं मीठ घाला. मग ही शिजलेली भाजी नोकरशाहीच्या चमच्याने खा. खाणारे म्हणतात, ""मोठी मजा येते!''फिल्मी चित्रतारे-तारका आणि देशातील पैलवान मंडळी लोकशाही वाचविण्यासाठी तत्पर आहेत. माझ्या मनात विचार येतो, मग मी मागे का राहावं? मी का वाचवू नये लोकशाही? पैलवानाला बदाम कुटता कुटता कुठली सवड मिळायला? चित्रतारे-तारकांना कुठल्या ना कुठल्या बॅग्राऊंड म्युझिकवर ओठ हलवावे लागतील, शारीरिक कवायत करावी लागेल. छे छे! माझ्याशिवाय लोकशाही वाचणं शक्य नाही.पण तेवढ्यात मला हा बिनतिकिटांचा लिफाफा दिसतो. मला आलेली भेटकार्डर्ं मी एका शेजारी एक लावून ठेवली. मग बघितलं, जवळजवळ पाच चौरस मीटर शुभकामना मला नव्या वर्षासाठी आल्या होत्या. इतकी कोरी कार्डं मला मिळाली असती तर ती मी विकून टाकली असती. पण त्या कार्डांवर माझं नाव आहे, म्हणून कोणी विकत घेणार नाही ती. नाव असलेली वस्तू विकत घ्यायला मी थोडाच चित्रतारा आहे? त्यांच्या अंडरवेअरसुद्धा लिलावात किती तरी अधिक किमतीत विकल्या जातात...तर सांगत काय होतो, दुसऱ्याच्या नावाची शुभकामना कुणाच्या कामाची?मी मांडलेल्या भेटकार्डांत ते विनातिकीट आलेलं भेटकार्डही आहे. कार्डावर माझ्या सुख-समृद्धीची कामना केलीय, ही गोष्ट खरी; पण ही शुभकामना स्वीकारण्यासाठी मला दहा रुपये द्यावे लागले. जी शुभकामना हाती येण्यासाठी मला दहा रुपये द्यावे लागले, ती काय माझं मंगल करणार? शुभचिंतक मला समृद्ध बघू इच्छितो, पण हे सांगण्यासाठी माझी संपदा-समृद्धी दहा रुपयांनी कमी करतो.शुभाची सुरुवात माझ्या बाबतीत नेहमी अशुभाने होते. समृद्धी येण्यासाठी हरियाणा, राजस्थानची लॉटरीची तिकिटं घेतली. पण कसलं काय न्‌ कसलं काय! लॉटरी उघडली. त्यात माझा नंबर नव्हता. राजकारणातल्यांना कशी लॉटरी लागते? आपल्याला अशी समृद्धी नाही मिळायची. ती आडवाटेने ये-जा करते. लाजते. कुलवती आहे ना! पडदानशीनही आहे. माझ्या एका विद्यार्थ्याने ती आडवाट शोधूनही काढलीय. एक दिवस भेटला. विचारलं, ""मोठ्या थाटामाटात राहताना दिसतोस! चांगला भक्कम पैसा कमावतोस ना?''तो म्हणाला, ""सर, बिझनेस लाइन पकडलीय.''मी म्हटलं, ""अच्छा! कोणता बिझनेस करतोस?''तो म्हणाला, ""सट्टा खेळतो!''या देशात "सट्टा' बिझनेसमध्ये सामील झालाय. समुद्रमंथन करून "लक्ष्मी' वर काढण्यासाठी दानवांना आता देवांच्या मदतीची गरज नाही. पहिल्या समुद्रमंथनाच्या वेळी त्यांना टेक्निक माहीत नव्हतं, त्यामुळे देवांची मदत घ्यावी लागली. आता त्यांनी टेक्निक आत्मसात केलंय.माझ्या बाबतीत प्रत्येक चांगली गोष्ट "नॉट पेड' होते. मागच्या वर्षी स्वच्छता सप्ताहाचं उद्‌घाटन माझ्या घराजवळ झालं. "साइट' चांगली होती. तिथे कचऱ्याचा एक मोठा ढीग लावला गेला. फोटोग्राफर कोन आणि प्रकाश बघून गेला. जाताना मंत्रिमहोदयांनी कुठं उभं राहून फावडं चालवायचं ते निश्चित करून गेला. ऑफिसर कचऱ्याची सजावट करायच्या मागे लागले. एक दिवस मंत्रिमहोदय आले. तीन-चार फावडी चालवून त्यांनी सफाई सप्ताहाचं उद्‌घाटन केलं. त्यानंतर कुणीही त्या कचऱ्याच्या ढिगाकडे फिरकलंही नाही. दरवर्षी सफाई सप्ताहाचं उद्‌घाटन होईल. तीन-चार फावडी कचरा ढिगातून काढला जाईल... आणि या गतीने कचऱ्याचा ढीग सुमारे 100 वर्षांत साफ होईल. मला पेशन्स आहे. मी वाट बघू शकतो. पण या वर्षी दुसरीच जागा निवडली गेली.सफाई सप्ताह कचऱ्याचा ढीग देऊन जातो आणि नववर्ष "नॉट पेड शुभेच्छा!' तरीही मी संसदेत जायची मनीषा बाळगून आहे. एकदा एका सद्‌गृहस्थांना मी म्हटलं, ""यंदा मी निवडणूक लढवणार आहे.''ते म्हणाले, ""निवडणूक लढवून काय होणार?''मी म्हटलं, ""मी संसद सदस्य होईन.''ते म्हणाले, ""संसद सदस्य झाल्यामुळे काय होईल?''मी म्हटलं, ""मी मंत्री होईन.''ते म्हणाले, ""मंत्री झाल्यामुळे काय होईल?''मी म्हणालो,""मी मुख्यमंत्री होईन.''ते म्हणाले, ""मुख्यमंत्री झाल्यामुळे काय होईल?''मी म्हटलं, ""मी गरिबी हटवेन.''ते म्हणाले, ""गरिबी हटवल्यामुळे काय होईल?''मी म्हटलं, ""लोक सुखी होतील.''ते म्हणाले, ""पण भाऊ, लोक सुखी झाल्याने काय होईल?''याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. कसे झालेत हे भारतीय लोक! कसं झालंय त्यांचं मन! मग मला वाटलं, मलाच नाही, तर साऱ्या देशवासीयांना "नॉट पेड शुभकामना' येताहेत. आता त्यांची अशी अवस्था झालीय, की ते विचारताहेत, ""सुखी झाल्याने तरी काय होणार?''मित्र म्हणाले, ""तू निवडणूक लढवणार आहेस ना, मग तू जनतेचा उमेदवार हो. जनसमर्थित उमेदवार!''मी गेली कित्येक वर्षं या भारतीय जनाच्या शोधात आहे; पण तो सापडतच नाही. कुणी तरी म्हणालं, ""निवडणुकीच्या वेळी भेटतो हा भारतीय जन.'' आताच्या एका निवडणुकीत मी त्याला शोधू लागलो. जवळजवळ प्रत्येक पार्टीने मुसलमानांची मते मिळवण्यासाठी मौलवींना बोलावलं. मौलवीने फतवा काढला, "हे मुसलमानांनो, तुम्ही ईदच्या चंद्राबाबत माझं मत मानता. निवडणुकीच्या मतांबद्दलही माझं मत माना. माझं म्हणणं ऐका.' जैनांची मतं मिळवण्यासाठी अखिल भारतीय जैन नेत्याला बोलावलं. यातही दिगंबरांसाठी दिगंबर नेता, श्वेतांबरांसाठी श्वेतांबर नेता. स्थानकवासी आणि तेरापंथी नेते भेटले असते तर आणखीनच चांगलं झालं असतं. या क्षेत्रातील ब्राह्मणांना सांगितलं, ""इथून नेहमी ब्राह्मण निवडणूक जिंकत आलाय. गेल्या वीस वर्षांचं रेकॉर्ड आहे. जर या वेळी कुणी ब्राह्मणेतर निवडणूक जिंकला तर...तुमचा धिक्कार...धिक्कार तुम्हा ब्राह्मणांचा...!''कुठे आहे भारतीय जन? कुणासारखा आहे? "सुखीसंपन्न झाल्यामुळे काय होणार?' असं म्हणणारा तर तो जन नाही ना? की तो आहे भारतीय जन? तो रस्त्याने तर "भारतीय' होण्यासाठी चाललाय; पण कुणी तरी त्याला रोखून म्हणतंय, ""चल, परत फीर! तू भारतीय नाहीस! ब्राह्मण आहेस...जैन आहेस...तेली आहेस... नाभिक आहेस...मुसलमान आहेस...''"नॉट पेड' भेटकार्ड माझ्या डोळ्यांत वटारून पाहतं आणि म्हणतं, "काळाचा इशारा लक्षात घे आणि परत फीर!' तुझ्याकडून लोकशाही वाचणार नाही. निवडणूक जिंकून लोकशाही वाचवण्याचं काम नववर्षाला तुझ्याकडे सोपवायचं असतं तर माझ्यावर पूर्ण तिकीट चिकटलं नसतं का?''
-----------------------------------------------------------------------------------
उज्ज्वला केळकर176/2, "गायत्री',
वसंतदादा साखर कामगारभवनजवळ, सांगली- 416416, फोन : 0233-2310020

आडवाटेचा ज़माना

0 comments

आडवाटेचा ज़माना
मूळ लेखक : हरिशंकर परसाई Harishankar Parsai
अनुवाद : उज्ज्वला केळकर Ujjwala Kelkar

मी इमानदार बनण्याचा पुन्हा प्रयत्न केला, आणि पुन्हा अयशस्वी झालो. एकदा एक सद्‌गृहस्थ माझ्याकडे आले. माझ्या ओळखीच्या प्राध्यापकांना सांगून मी त्यांच्या मुलाचे मार्क वाढवावेत, अशी त्यांनी मला विनंती केली. एरवी मी त्यांचं काम केलं असतं. परंतु खूप दिवसांनंतर मला प्रामाणिकपणाची आठवण झाली होती आणि मी पूर्णपणे प्रामाणिक बनण्याची प्रतिज्ञा त्या काळात केली होती. त्या सद्‌गृहस्थांचं बोलणं ऐकून मला जुन्या कथा आठवल्या आणि मी विचार करू लागलो, की मी प्रतिज्ञा करतो न करतो तोच हे इंद्र किंवा विष्णू परीक्षा घेण्यासाठी इथे येऊन पोहोचले की काय? या काळात कुणी दीर्घकाळ तपश्चर्या करेल यावर त्यांचा विश्वास नाही. चार गोष्टी लिहून लोक युगप्रवर्तकांच्या यादीत आपलं नाव शोधू लागतात. त्यामुळे देवही आता तपश्चर्या सुरू होताच परीक्षा घेण्यासाठी येऊन पोहोचतात. मी त्यांना प्रणाम केला आणि प्रत्यक्षात म्हटलं, ""मी हे सगळं अनुचित आणि अनैतिक मानतो. मी हे काम करणार नाही.'' मला आशा होती, की ते आता आपल्या मूळ देवस्वरूपात प्रगट होतील आणि म्हणतील, ""बा वत्सा, तू परीक्षेत पूर्णपणे उतरला आहेस. बोल, तुला काय हवं? मी आत्ता वर देण्याच्या मूडमध्ये आहे. बोल, काय करू तुझ्यासाठी? हिंदी साहित्याच्या इतिहासात तुझ्यावर एक प्रकरण लिहिवून घेऊ? की कुणा समीक्षकाला तुझ्या घरी पाणी भरण्याची ड्यूटी लावू?''ते मूळ स्वरूपात आले; पण ते रूप मुळीच प्रसन्न नव्हतं, रोषपूर्ण होतं. ते बडबडत निघून गेले. मी ऐकलं, ते लोकांना माझ्याविषयी सांगत होते, ""आज-काल तो साला मोठा प्रामाणिक बनलाय!'' मी ज्यांना देव समजत होतो तो तर साधा माणूसच निघाला. मी माझ्या आत्म्याला विचारलं, ""हे माझ्या आत्म्या, तूच सांग, शिव्या खाऊन आणि बदनामी करून घेऊन मी इमानदार, प्रामाणिक बनून राहू?''आत्म्यानं उत्तर दिलं, ""नाही, तशी काही जरूर नाही. इतकी काय घाई आहे? पुढे काळ बदलेल, तेव्हा बन इमानदार नि प्रामाणिक!''माझा आत्मा कधी कधी योग्य रीतीने गुंत्याची उकल करतो. चांगला आत्मा फोल्डिंग खुर्चीसारखा असायला हवा. गरज लागली तर ती उघडून बसावं, नाही तर मिटवून ती कोपऱ्यात उभी करून ठेवावी. जेव्हा जेव्हा मला आत्मा अडवतो तेव्हा तेव्हा मला जुन्या कथांची आठवण होते. या जुन्या कथांमधील राक्षस आपला आत्मा दूरच्या पहाडावरील एखाद्या पोपटात का ठेवत होते? ते त्यापासून मुक्त होऊन बिनदिक्कतपणे राक्षसी काम करू शकत होते. देव आणि दानव यात अजूनही हाच फरक आहे. एकाचा आत्मा त्याच्याजवळच असतो आणि दुसऱ्याचा त्याच्यापासून दूर! मी अशी काही माणसं पाहिली आहेत, ज्यांच्यापैकी काहींनी आत्मा कुत्र्यात ठेवला आहे, काहींनी डुकरात. आता तर जनावरांनीही ही विद्या शिकून घेतलीय. काही कुत्री आणि डुकरं आपला आत्मा काही काही माणसांमध्ये ठेवतात. आत्मा म्हणाला, तेव्हा मी प्रामाणिक बनण्याचा इरादा सोडून दिला. राधेश्यामनेही असा प्रयत्न केला होता आणि तोही आपल्या प्रयत्नात अयशस्वी झाला होता. त्याचं एक छोटंसं दुकान होतं. त्याने विक्रीच्या पैशाचा अगदी खरा हिशोब ठेवला आणि तो विक्रीकराच्या कार्यालयात घेऊन गेला. तिथे त्याला सांगितलं गेलं, की हिशोब खोटा आहे. त्याला त्याचा खरा हिशोब खरा ठरवण्यासाठी लाच द्यावी लागली. खऱ्यासाठी लाच देण्यापेक्षा खोट्यासाठी लाच देणं केव्हाही चांगलंच ना? इतका महाग प्रामाणिकपणा आपल्या कुवतीच्या बाहेरचा आहे. यापेक्षा अप्रामाणिकपणा जास्त स्वस्त आहे. एक स्त्री नोकरीसाठी एका मोठ्या माणसाकडे चारित्र्याचं प्रमाणपत्र मागायला गेली. त्या मोठ्या माणसाने तिला प्रथम आपल्या शयनकक्षात घेऊन जाण्याची इच्छा प्रदर्शित केली नि मग सच्चारित्र्याचं प्रमाणपत्र द्यायचं ठरवलं. प्रथम देव माणसं बनून फसवत होते. आता माणसं देव बनून फसवतात. प्रत्येक सत्याच्या हातात खोट्याचं प्रमाणपत्र असलेलं दिसतं. प्रामाणिकपणाजवळ अप्रामाणिकपणाने केलेल्या शिफारशीची चिठ्ठी नसेल तर कुणी त्याला दोन पैशालासुद्धा विचारणार नाही. हाच सगळा विचार करून मी शिथिल झालो. आता मी मोकळेपणाने मार्क वाढवू शकतो. या दिवसांत मला खूप स्नेही भेटतात. वर्षातून एखाद-दुसऱ्या वेळीच ते मला पूर्वी भेटायचे. त्यांना आलेलं पाहताच ते कोणत्या कामासाठी आलेले आहेत ते माझ्या लक्षात येतं. मोसम पाहून मी येणाऱ्याचं काम काय आहे ते सांगू शकतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा मेघ दाटून आलेले असतात, धरतीने हिरवी ओढणी धारण केलेली असते, आसपास मोर-चातकांचे स्वर गुंजत असतात, निग्रो सुंदरीच्या दातांप्रमाणे वीज चमकत असते, अशा सुरेख समयी कुणी अनेक महिन्यांनंतर आलेलं पाहिलं की लक्षात येतं, की हे काही गीत गाण्यासाठी आलेले नाहीत, आपल्या मुलांना शाळेत घालण्यासाठी मदत मागायला आले आहेत. इकडे मार्चमध्ये जो येतो तो मार्क वाढवण्यासाठी किंवा पेपर आऊट करवण्यासाठी. खरी गोष्ट अशी आहे, की सगळ्या तुकड्यांची "सिलॅबस' आणि "प्रॉस्पेक्टस' चुकीची आहेत. त्यात जरूर असलेल्या अशा दोन कागदांचा उल्लेखच असत नाही. एक कागद सुरुवातीचा आणि एक कागद शेवटचा. पहिला कागद पेपर आऊट करण्याचा असतो आणि दुसरा मार्क वाढवण्याचा. जो या कागदांचा नीट अभ्यास करतो तो पास होतो. फर्स्टक्लाससुद्धा मिळवू शकतो. हे कागद म्हणजे प्रश्र्नपत्रिका. काही विद्यार्थी ती स्वत:च तयार करतात. ते प्रतिभावान असतात आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. काहींचे पालक या प्रश्र्नपत्रिका तयार करतात. अशा दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य संदिग्ध असतं. त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांचंच भविष्य बरं आहे, असं म्हणायला हवं. अध्यापकांशी माझा संबंध असल्यामुळे माझ्याकडे दोन्ही प्रकारचे लोक येतात. काल जे आले होते ते दोन वर्षांपूर्वी एका लग्नात मला पहिले आणि शेवटचे भेटले होते. त्या छोट्याशा परिचयातून माझ्याविषयी त्यांना एवढी आत्मीयता वाटू लागली होती, की भाऊ परीक्षेला बसला आहे, म्हटल्यावर त्यांना माझी आठवण सतावू लागली. विरहिणीला पाऊसकाळात आपल्या प्रियकराची आठवण सतावते, तसंच परीक्षेच्या मोसमात काही लोकांचा विरह जागा होतो आणि त्यांना काही विशेष परिचितांची आठवण सतावू लागते. ते सांगू लागले, ""अमुक प्रोफेसर आपले मित्र आहेत. त्यांनी प्रश्नपत्रिका काढलीय. काही हिंट द्यायला सांगा नं!'' मला वाटू लागलं, की एखाद्याशी मैत्री आहे, तर त्याचा एवढाच उपयोग आहे की काय, की जरुर पडेल तेव्हा त्याच्याकडून चुकीचं काम करून घ्यावं? कुणी असं म्हणत नाही, की अमक्यांशी आपली मैत्री आहे, तर त्यांना समजावा ना, की असं चुकीचं काम करू नका. किंवा कुणी असंही म्हणत नाही, की अमुक आपला शत्रू आहे, तर त्याच्याकडून पेपर आऊट करून घेऊन त्याचं इमान बिघडवा. नाही. शत्रू सगळे सुरक्षित आहेत. इमान नेहमी मित्रांचंच बिघडवलं जातं. या सगळ्या प्रश्र्नपत्रिका फोडा म्हणणाऱ्या आणि मार्क वाढवा म्हणणाऱ्या लोकांना हसताही येत नाही त्याची दया वाटते. हे अतिशय त्रासलेले आणि भयभीत झालेले लोक असतात. कुणाला वाटत असतं, की मुलगा पास झाला म्हणजे त्याला नोकरी लावता येईल. त्यामुळे कुटुंबाची दुर्दशा थोडी कमी होईल. कुणाला वाटतं, मुलगा नापास झाला तर त्याचा वर्षभराचा अभ्यासाचा खर्च कसा भागवायचा? कुणाला वाटत असतं, मुलगी पास झाली तर लग्न करून थोडंसं ओझं हलकं करता येईल. खूप दु:खी-कष्टी असतात हे लोक. यात काही लोक तर इतके दीन असतात, की वाटतं, आधी त्यांच्या गळ्यात पडून रडून घ्यावं. माझ्या वैतागाचं कारण दुसरंच आहे. हे लोक आता बेधडकपणे, नि:संकोचपणे, निर्लज्जपणे काम करू लागले आहेत. दहा वर्षांपूर्वीही मी हे काम करून देत होतो. मार्क वाढवून द्या म्हणणारे घाबरत, चाचरत, लाजत, संकोचत त्याबद्दल बोलायचे. लोक सहजपणे तसं बोलत नसत. त्या वेळी लपून-छपून अशी चिठ्ठी यायची- "आपला दोस्त रमेशचंद्रचा भाऊ सुरेशची मोटरसायकल बिघडली आहे. तिच्यावर इंग्रजीत 2431 नंबर लिहिलेला आहे. ती आपला मित्र सिन्हा यांच्याकडे दुरुस्तीसाठी गेली आहे. आपण अशा तऱ्हेने त्यात सुधारणा करा, की ती कमीत कमी 40 टक्के तरी काम देऊ शकेल.' याचा अर्थ असा, की सुरेशचा रोल नंबर 2431 आहे. त्याचा इंग्रजीचा पेपर बिघडलाय. सिन्हा पेपर तपासताहेत आणि त्यांच्याकडून 40 टक्के गुण देववायचे आहेत. आता सरळ सरळ चिठ्ठी येते. उघडं पत्रसुद्धा येतं. त्या वेळी गुण वाढवायला येणारे खूप वेळ संकोचाने बसून राहत, इकडच्या-तिकडच्या गोष्टी करत आणि नंतर शरमून बगला झाकत मार्क वाढवण्याबद्दल बोलत असत. आता मार्क वाढवायला येणारा अशा तऱ्हेने येतो, जसा काही बाजारात भाजी घ्यायला चाललाय! सरळ माझ्या डोळ्यांत पाहतो आणि अधिकारवाणीने सांगतो, की मार्क वाढवायचे आहेत. दहा वर्षांत ही जी काही प्रगती झाली आहे ती मला त्रास देते. अत्यंत संकोचहीनता झालीय. लोकांचं हे साहस मला घाबरवतं. मी वाट बघतो, की कुणी तरी थोडासा संकोच घेऊन येईल आणि मी आश्वस्त होईन. कोणी येत नाही. मला वाटतंय, आम्ही सगळ्यांनी हे मान्य केलंय, की साधारण असलेले सगळे रस्ते बंद झालेत. त्यावर पाटी टांगलीय : "रस्ते दुरुस्तीसाठी बंद आहेत.' वर्षानुवर्षं हे रस्ते बंद आहेत आणि सगळे आडवाटेने चाललेत. चालता चालता आडवाटेवरची झाडं-झुडपं, काटेकुटे साफ झालेत आणि या वाटा मोठ्या रस्त्यांसारख्याच गुळगुळीत आणि रुंद झाल्यात. अनवाणी लोक बेधडकपणे या वाटेवरून चाललेत. साधारण रस्त्याने जाणारा आता मूर्ख आणि वेडा समजला जाईल. आता साधारण रस्ते खुले झाले तरी लोक त्यावरून चालताना कचरतील. दुरुस्ती करणारेही याच कारणासाठी शिथिल झालेत. वहिवाटीत न आल्याने आता साधारण रस्त्यांवर झाडोरा, जंगली झाडं उगवतील आणि रस्ते झाकून जातील. त्या वेळी कुणालाही जाणवणार नाही, की या देशात साधारण रस्तेही आहेत. साधारण रस्ते आता भविष्यात पुरातत्त्ववेत्त्यांनाच मिळतील. तेच हे रस्ते शोधून काढतील. ते निष्कर्ष काढून सांगतील, की त्या काळात या देशात साधारण रस्ते होते, पण कुणी त्यावरून चालत नव्हतं. सगळे आडवाटेनेच जायचे. उपयोगात न आल्याने रस्ते दबून गेले. सफलतेच्या महालाचा समोरचा दरवाजा बंद झालाय. अनेक लोक आत घुसलेत आणि त्यांनी कडी लावून घेतलीय. ज्याला आत घुसायचंय तो नाकाला रुमाल लावून गटारीतून आत घुसतो. आसपास सुगंधित रुमालांची दुकानं लागलीत. लोक रुमाल खरेदी करून नाकाला लावून गटारीतून आत घुसताहेत. ज्यांना दुर्गंधी जास्त येते, जे फक्त मुख्य दरवाज्यातूनच आत जाऊ इच्छितात, ते दरवाज्याच्या बाहेर उभं राहून डोकं आपटताहेत आणि त्यांच्या कपाळातून रक्त वाहतंय. ---------------------------------------------------------------------------------- उज्ज्वला केळकर176/2, "गायत्री', वसंतदादा साखर कामगारभवनजवळ, सांगली- 416416, फोन : 0233-2310020
 
MySpace Backgrounds