लेखिकेची संपुर्ण माहिती इथे पहा

Monday, August 10, 2009

नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही

नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही मूळ लेखक : हरिशंकर परसाई Harishankar Parsai अनुवाद : उज्ज्वला केळकर Ujjwala Kelkar नवीन वर्ष माझ्यासाठी शुभेच्छा असलेल्या भेटकार्डांचा नॉट पेड लिफाफा घेऊन अवतरलं. राजकारण्यांसाठी ते मतपेट्या घेऊन आलं होतं. दोन्हीही नॉट पेडच! मला शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी दहा रुपये खर्च करावे लागले. राजकारण्यांना खूपच "नॉट पेड' चार्ज चुकवावा लागेल.माझ्या आसपास "लोकशाही वाचवा...प्रजातंत्र वाचवा...घटना वाचवा...' अशा घोषणा दिल्या जाताहेत. लोकशाही वाचवण्यासाठी इतके लोक उभे राहिले आहेत, की त्यामुळेच लोकशाही वाचणं मुश्कील वाटू लागलंय. लोकशाही वाचण्यापूर्वी पहिला प्रश्न मनात येतो, "कुणासाठी बरं वाचवायची ही लोकशाही?' लोकशाही वाचली आणि नुसतीच पडून राहिली, तर ती काय कामाची? परसातली भाजी मोकाट गुरा-ढोरांपासून वाचवायची ती कशासाठी? उभ्या उभ्या जळून जाण्यासाठी? नाही नाही, मुळीच नाही! भाजी राखणारा भाजी शिजवून खातो हे खरं! पण आता खाणारे इतके जास्त झालेत, की लोकशाहीच्या वाटणीसाठीच यापुढे भांडणं होत राहणार.तरीही एक प्रश्न उरतोच : लोकशाही वाचणार कशी? कोणतं इंजक्शन उपयुक्त ठरेल, परिणामकारक-प्रभावी ठरेल? सतत कुठली ना कुठली निवडणूक लढवणाऱ्या एका निवडणूकफेम नेत्याला मी म्हटलं, ""भाऊसाहेब, आईच्या पोटात शिरल्यापासून आपण राजकारणात आहात! सांगा ना, लोकशाही कशामुळे वाचेल? कुणी म्हणतं, समाजवादामुळे लोकशाही वाचेल. कुणी म्हणतं, समाजवादामुळे लोकशाही मरेल. कुणी म्हणतं, गरिबी हटल्याशिवाय प्रजातंत्र आणता येणार नाही. कुणी म्हणतं, गरिबी हटवणं म्हणजे हुकुमशाही आणणं. कुणी म्हणतं, अमुकतमुक नेताच लोकशाही वाचवू शकेल, तर दुसरं कुणी म्हणतं, तो नेता तर लोकशाही नष्ट करण्याच्या मागे लागलाय. आपण सांगा, लोकशाही कशी वाचेल?''भाऊसाहेब म्हणाले, ""या सगळ्या शंभर गोष्टींचं एक सूत्र मी तुला सांगतो.''""अं...ते कोणतं?'' मी भाविक चेहरा धारण करून ऐकू लागलो.""आपण वाचलो-की लोकशाही वाचेल. आपण जगलो- वाचलो तर दुनिया वाचेल. मी निवडून आलो तर मी नक्कीच लोकशाही वाचवेन...बरं, निघू मी? तिकिटासाठी प्रयत्न करायचेत...''मला वाटू लागलं, की आपणही निवडणूक लढवावी आणि लोकशाही वाचवावी. जेव्हा लोकशाहीची भाजी शिजेल तेव्हा आपल्याही वाटणीला एक प्लेट येईल. जे गेली कित्येक वर्षं लोकशाहीची भाजी खाताहेत ते म्हणताहेत, ""मोठी स्वादिष्ट लागते ही भाजी!'' लोकशाहीच्या भाजीला जी लोकांची साल चिकटली आहे ती सोलून टाका. मग त्या तंत्राला शिजवा. आदर्शांचा मसाला आणि कागदी कार्यक्रमांचं मीठ घाला. मग ही शिजलेली भाजी नोकरशाहीच्या चमच्याने खा. खाणारे म्हणतात, ""मोठी मजा येते!''फिल्मी चित्रतारे-तारका आणि देशातील पैलवान मंडळी लोकशाही वाचविण्यासाठी तत्पर आहेत. माझ्या मनात विचार येतो, मग मी मागे का राहावं? मी का वाचवू नये लोकशाही? पैलवानाला बदाम कुटता कुटता कुठली सवड मिळायला? चित्रतारे-तारकांना कुठल्या ना कुठल्या बॅग्राऊंड म्युझिकवर ओठ हलवावे लागतील, शारीरिक कवायत करावी लागेल. छे छे! माझ्याशिवाय लोकशाही वाचणं शक्य नाही.पण तेवढ्यात मला हा बिनतिकिटांचा लिफाफा दिसतो. मला आलेली भेटकार्डर्ं मी एका शेजारी एक लावून ठेवली. मग बघितलं, जवळजवळ पाच चौरस मीटर शुभकामना मला नव्या वर्षासाठी आल्या होत्या. इतकी कोरी कार्डं मला मिळाली असती तर ती मी विकून टाकली असती. पण त्या कार्डांवर माझं नाव आहे, म्हणून कोणी विकत घेणार नाही ती. नाव असलेली वस्तू विकत घ्यायला मी थोडाच चित्रतारा आहे? त्यांच्या अंडरवेअरसुद्धा लिलावात किती तरी अधिक किमतीत विकल्या जातात...तर सांगत काय होतो, दुसऱ्याच्या नावाची शुभकामना कुणाच्या कामाची?मी मांडलेल्या भेटकार्डांत ते विनातिकीट आलेलं भेटकार्डही आहे. कार्डावर माझ्या सुख-समृद्धीची कामना केलीय, ही गोष्ट खरी; पण ही शुभकामना स्वीकारण्यासाठी मला दहा रुपये द्यावे लागले. जी शुभकामना हाती येण्यासाठी मला दहा रुपये द्यावे लागले, ती काय माझं मंगल करणार? शुभचिंतक मला समृद्ध बघू इच्छितो, पण हे सांगण्यासाठी माझी संपदा-समृद्धी दहा रुपयांनी कमी करतो.शुभाची सुरुवात माझ्या बाबतीत नेहमी अशुभाने होते. समृद्धी येण्यासाठी हरियाणा, राजस्थानची लॉटरीची तिकिटं घेतली. पण कसलं काय न्‌ कसलं काय! लॉटरी उघडली. त्यात माझा नंबर नव्हता. राजकारणातल्यांना कशी लॉटरी लागते? आपल्याला अशी समृद्धी नाही मिळायची. ती आडवाटेने ये-जा करते. लाजते. कुलवती आहे ना! पडदानशीनही आहे. माझ्या एका विद्यार्थ्याने ती आडवाट शोधूनही काढलीय. एक दिवस भेटला. विचारलं, ""मोठ्या थाटामाटात राहताना दिसतोस! चांगला भक्कम पैसा कमावतोस ना?''तो म्हणाला, ""सर, बिझनेस लाइन पकडलीय.''मी म्हटलं, ""अच्छा! कोणता बिझनेस करतोस?''तो म्हणाला, ""सट्टा खेळतो!''या देशात "सट्टा' बिझनेसमध्ये सामील झालाय. समुद्रमंथन करून "लक्ष्मी' वर काढण्यासाठी दानवांना आता देवांच्या मदतीची गरज नाही. पहिल्या समुद्रमंथनाच्या वेळी त्यांना टेक्निक माहीत नव्हतं, त्यामुळे देवांची मदत घ्यावी लागली. आता त्यांनी टेक्निक आत्मसात केलंय.माझ्या बाबतीत प्रत्येक चांगली गोष्ट "नॉट पेड' होते. मागच्या वर्षी स्वच्छता सप्ताहाचं उद्‌घाटन माझ्या घराजवळ झालं. "साइट' चांगली होती. तिथे कचऱ्याचा एक मोठा ढीग लावला गेला. फोटोग्राफर कोन आणि प्रकाश बघून गेला. जाताना मंत्रिमहोदयांनी कुठं उभं राहून फावडं चालवायचं ते निश्चित करून गेला. ऑफिसर कचऱ्याची सजावट करायच्या मागे लागले. एक दिवस मंत्रिमहोदय आले. तीन-चार फावडी चालवून त्यांनी सफाई सप्ताहाचं उद्‌घाटन केलं. त्यानंतर कुणीही त्या कचऱ्याच्या ढिगाकडे फिरकलंही नाही. दरवर्षी सफाई सप्ताहाचं उद्‌घाटन होईल. तीन-चार फावडी कचरा ढिगातून काढला जाईल... आणि या गतीने कचऱ्याचा ढीग सुमारे 100 वर्षांत साफ होईल. मला पेशन्स आहे. मी वाट बघू शकतो. पण या वर्षी दुसरीच जागा निवडली गेली.सफाई सप्ताह कचऱ्याचा ढीग देऊन जातो आणि नववर्ष "नॉट पेड शुभेच्छा!' तरीही मी संसदेत जायची मनीषा बाळगून आहे. एकदा एका सद्‌गृहस्थांना मी म्हटलं, ""यंदा मी निवडणूक लढवणार आहे.''ते म्हणाले, ""निवडणूक लढवून काय होणार?''मी म्हटलं, ""मी संसद सदस्य होईन.''ते म्हणाले, ""संसद सदस्य झाल्यामुळे काय होईल?''मी म्हटलं, ""मी मंत्री होईन.''ते म्हणाले, ""मंत्री झाल्यामुळे काय होईल?''मी म्हणालो,""मी मुख्यमंत्री होईन.''ते म्हणाले, ""मुख्यमंत्री झाल्यामुळे काय होईल?''मी म्हटलं, ""मी गरिबी हटवेन.''ते म्हणाले, ""गरिबी हटवल्यामुळे काय होईल?''मी म्हटलं, ""लोक सुखी होतील.''ते म्हणाले, ""पण भाऊ, लोक सुखी झाल्याने काय होईल?''याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. कसे झालेत हे भारतीय लोक! कसं झालंय त्यांचं मन! मग मला वाटलं, मलाच नाही, तर साऱ्या देशवासीयांना "नॉट पेड शुभकामना' येताहेत. आता त्यांची अशी अवस्था झालीय, की ते विचारताहेत, ""सुखी झाल्याने तरी काय होणार?''मित्र म्हणाले, ""तू निवडणूक लढवणार आहेस ना, मग तू जनतेचा उमेदवार हो. जनसमर्थित उमेदवार!''मी गेली कित्येक वर्षं या भारतीय जनाच्या शोधात आहे; पण तो सापडतच नाही. कुणी तरी म्हणालं, ""निवडणुकीच्या वेळी भेटतो हा भारतीय जन.'' आताच्या एका निवडणुकीत मी त्याला शोधू लागलो. जवळजवळ प्रत्येक पार्टीने मुसलमानांची मते मिळवण्यासाठी मौलवींना बोलावलं. मौलवीने फतवा काढला, "हे मुसलमानांनो, तुम्ही ईदच्या चंद्राबाबत माझं मत मानता. निवडणुकीच्या मतांबद्दलही माझं मत माना. माझं म्हणणं ऐका.' जैनांची मतं मिळवण्यासाठी अखिल भारतीय जैन नेत्याला बोलावलं. यातही दिगंबरांसाठी दिगंबर नेता, श्वेतांबरांसाठी श्वेतांबर नेता. स्थानकवासी आणि तेरापंथी नेते भेटले असते तर आणखीनच चांगलं झालं असतं. या क्षेत्रातील ब्राह्मणांना सांगितलं, ""इथून नेहमी ब्राह्मण निवडणूक जिंकत आलाय. गेल्या वीस वर्षांचं रेकॉर्ड आहे. जर या वेळी कुणी ब्राह्मणेतर निवडणूक जिंकला तर...तुमचा धिक्कार...धिक्कार तुम्हा ब्राह्मणांचा...!''कुठे आहे भारतीय जन? कुणासारखा आहे? "सुखीसंपन्न झाल्यामुळे काय होणार?' असं म्हणणारा तर तो जन नाही ना? की तो आहे भारतीय जन? तो रस्त्याने तर "भारतीय' होण्यासाठी चाललाय; पण कुणी तरी त्याला रोखून म्हणतंय, ""चल, परत फीर! तू भारतीय नाहीस! ब्राह्मण आहेस...जैन आहेस...तेली आहेस... नाभिक आहेस...मुसलमान आहेस...''"नॉट पेड' भेटकार्ड माझ्या डोळ्यांत वटारून पाहतं आणि म्हणतं, "काळाचा इशारा लक्षात घे आणि परत फीर!' तुझ्याकडून लोकशाही वाचणार नाही. निवडणूक जिंकून लोकशाही वाचवण्याचं काम नववर्षाला तुझ्याकडे सोपवायचं असतं तर माझ्यावर पूर्ण तिकीट चिकटलं नसतं का?''
-----------------------------------------------------------------------------------
उज्ज्वला केळकर176/2, "गायत्री',
वसंतदादा साखर कामगारभवनजवळ, सांगली- 416416, फोन : 0233-2310020

0 comments:

Post a Comment

 
MySpace Backgrounds