लेखिकेची संपुर्ण माहिती इथे पहा

Monday, November 9, 2009

आपले लक्ष्य

अरे.....माझ्या हाताला इतक्या वेदना का होताहेत ? आणि इतकं रक्तं.... अरे...अरे...मिस्टर द्रोणनाथन, आपण इतके निर्दयी कसे होऊ शकता ? आपण माझा अंगठा का कापलात ? वेदनेने कळवळत एकलव्य जागा झाला. त्याने आपला उजवा हात चाचपडला. आपला अंगठा सुरक्षित पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याला वाटलं, आपल्याला पडलेलं हे भीतीदायक स्वप्नं आपल्याला जीवनात होणा-या दुःख वेदनेचा आरसा तर नसेल ? तो मनातल्या मनात म्हणाला, " हे दुःख या वेदना किती काळ माझ्याजवळ रहाणार, कुणास ठाऊक ? " तो उठून आपल्या खोलीला लागून असलेल्या बाल्कनीत गेला. बाहेरचं मोकळं आकाश पाहून त्याने आपले दोन्ही हात पसरले आणि करुणा भाकली. " परमेश्वरा, तू माझी असहाय्यता किती काळपर्यंत अशी नुसतीच बघत बसणार ? नुसताच बघत रहाशील, की कधी खालीही येशील ?...." एवढ्यात त्याने खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं, सोसायटीच्या पार्किंगमध्ये सामानाने भरलेला एक टेम्पो येऊन उभा रहिलाय. तो उत्सुकतेने खाली गेला. खाली येताच त्याला दिसलं, की टेम्पोच्या मागे एक रिक्षा उभी आहे. रिक्षातून जवळ जवळ सहा फूट उंचीचा, आकर्षक व्यक्तिमत्वाचा एक माणूस खाली उतरला. त्याने जीन्स आणि पांढ-या रंगाचा कुडता घातला होता. या साध्या वेशातही त्याचं व्यक्तिमत्व तेजस्वी आणि असामान्य असं प्रतीत होत होतं. एकलव्याला वाटलं, टी. व्ही.वरील महाभारताच्या सिरियलमधून कुणा दिव्य पुरुषाचं आगमन झालय, कारण त्याच्या प्रसन्न मुखमुद्रेवर दिव्यत्वाची आभा झळकत होती. त्या अपरिचित माणसाचं दिव्य रूप पहून एकलव्याच्या मनात खुशीची लहर निर्माण झाली. एकलव्याला त्यावेळी माहीत नव्हतं, की ईश्वराने त्याची प्रार्थना किती लवकर ऐकली. एकलव्याच्या मनात त्या नव्या माणसाची ऒळख करून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्या माणसाच्या जवळ जाऊन एकलव्याने विचारले, " आपल्याला या पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. आपण नव्याने या बिल्डिंगमध्ये रहाण्यासाठी आला आहात का ? " आपल्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरचा एक फ्लॅट रिकामा आहे, हे एकलव्याला माहीत होते. " होय आणि नाहीही ! " तो अपरिचित माणूस गंभीरपणे म्हणाला. त्या माणसाचं असं गोंधळात टाकणारं उत्तर ऐकून एकलव्य विचारात पडला. त्याला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. होय पण... आणि नाही पण.... याचा अर्थ काय ? काही वेळ गप्प बसून, काहीशा साशंकतेने तो त्या नव्या व्यक्तिला न्याहाळू लागला. आपल्या प्रश्नाचं खरं खुरं उत्तर मिळवण्याच्या प्रयत्नात पुढे म्हणाला, " ते कसं काय ? " " हा फ्लॅट माझ्या मित्राचा आहे. फ्लॅटबाबत कोर्टात केस चालू आहे. कोर्टाचा निर्णय माझ्या मित्राच्या बाजूने लागला, तर मी इथे राहीन.... नाही तर मी इथून दुसरीकडे कुठे तरी निघून जाईन ! " त्या माणसाने आपल्या पहिल्या उत्तराचं रहस्य उलगडलं. एकलव्याने सगळं नीट समजल्यासारखी होकारार्थी मान हलवली. " अच्छा.... असं आहे तर... आपल्याकडे पुष्कळ सामान दिसतय. आपलं सामान वर नेण्यासाठी मी आपल्याला मदत करू का ? " एकलव्याला माहीत नव्हतं, की त्याचं आणखी एक उत्तर त्याला पुन्हा कोड्यात टकणार आहे. " जरूर ! " त्या माणसाचं हे दुसरं उत्तर. पण तो एवढच बोलून थांबला नाही. तो पुढे म्हणाला, " तुम्ही माझी मदत करू शकता पण.... " " पण काय ? " " जर तुम्ही स्वतःची मदत करू शकत असाल तर....." " म्हणजे याचा अर्थ काय ? " एकलव्याने चमकून विचारले. " स्वतःची मदत करणाराच माणूस खूश, आनंदी राहू शकतो आणि आनंदी, खूश असलेल्या लोकांनीच केलेली मदत मी स्वीकारतो...." त्या अपरिचित माणसाची अट ऐकून एकलव्याला थोडी लाज वटली. मिस्टर द्रोणनाथनचा चेहरा त्याच्यासमोर साकार झाला. द्रोणनाथन त्याच्या बॉसचं नाव. त्यांचे शब्द एकलव्याला आत्ताही ऐकू येत होते....." आपलं ड्रॉईंग मला पसंत पडलय. आपण कुशल आहात, पण आपल्या कौशल्याचा उपयोग आम्ही पुढ्च्या प्रोजेक्टमध्ये करून घेऊ. नाराज होण्याचं कारण नाही. " ऑफीसमधील ही घटना आठवून एकलव्य काही काळगप्प झाला. मग काहीशा खजील स्वरात म्हणाला, " मी यावेळी दुःखी आहे, पण अपल्याला मदत करण्यात मला आनंदच वाटेल. " " मग तर तू माझी मदत करच ! पण त्यापूर्वी माझा एक छोटा विनोद ऐक. " त्या नव्या माणसाने पहिल्या सारख्याच गंभीरपणे म्हंटलं. आता एकलव्याला धीर आला. एकलव्याला त्याच्या बोलण्यातून असं मुळीच जाणवलं नाही, की तो थट्टा करतोय. तो विचार करू लागला, याचा चेहरा- मोहरा तेजस्वी आणि आनंदी दिसतोय, पण काही विचारलं तर विलक्षणच उत्तर देतोय. मग त्याला वाटलं, जिथं इतका वेळपर्यंत त्याला सहन केलं, तिथं आणखी थोडा वेळ....असा विचार करून त्याने त्याचा विनोद ऐकण्यासाठी होकार भरला. " काय ऐकतोयस ना ? " त्या माणसाने आपलं हसू लपवत विचारलं. " अं.....हो ! " " दोघे मित्र आपापसात गप्पा मारत आपल्याच नादात रस्त्यातून चालले होते. पहिल्या मित्राने तक्रार करत दुस-या मित्राला म्हंटलं, " तू हा चष्मा का वापरतोस ? तू हा चष्मा लावतोस, तेव्हा तू मला अगदी घुबडासारखा दिसतोस." पहिल्या मित्राच्या प्रश्नाचं शांतपणे उत्तर देत दुसरा मित्र म्हणाला," जेव्हा मी चष्मा वापरत नाही, तेव्हा तू मला घुबडासारखा दिसतोस. " विनोद ऐकून आणि त्याच्या, तो सांगण्याच्या शैलीने, एकलव्य खो खो हसू लागला. एकलव्याला मनमोकळं हसताना बघून त्या नव्या माणसाने खोडकरपणे म्हंटलं, " आता तू काहीसा माझी मदत करण्याच्या लायकीचा झाला आहेस. " " याचा अर्थ काय ? " नव्या माणसाने एकलव्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता दुसरा विनोद सांगायला सुरुवात केली. " एका मित्राने आपल्या दुस-या खेडवळ मित्राला विचारलं, " गांधीजयंतीबद्दल तुला काय माहिती आहे ? " तेव्हा तो खेडवळ मित्र म्हणाला, गांधीजी एक महान पुरुष होते, पण जयंती कोण होती, हे नाही माहीत मला ! एकलव्य कोड्यात पडल्यासारखा हसू लागला. त्याला कळेना, की त्याने हसतच रहावं, की तिथून निघून जावं ? तेवढ्यात त्याला त्या माणसाचे शब्द ऐकू आले, " उभा का राहिलाहेस ? चल माझी मदत कर ! " एकलव्याने त्या माणसाचं सामान उचललं आणि बिल्डिंगकडे निघाला. " आता तू माझी मदत करू शकतोस, कारण आता तू खूश आहेस. " " आपण नेहमी असंच करता ? " एकलव्याने सामान्य स्थितीत येत विचारले. " हो ! मी नेहमी खूश असणा-या लोकांकडूनच मदत घेतो. जर ते खूश नसतील, तर प्रथम त्यांना खूश करतो, कारण खूश, आनंदी असणारा माणूसच कुणाचीही योग्य त-हेने मदत करू शकतो. आपल्या दुःखात चूर असणार्‍या माणसाची योग्य त-हेने मदत करण्याची कुवत नसते. " नव्या माणसाचं हे बोलणं एकलव्याच्या बुद्धीपेक्षा ह्रुदयाला स्पर्श करून गेलं. त्याने त्या अपरिचिताला लिफ्ट्द्वारे वरच्या फ्लॅटपर्यंत पोचवले. सामान घेऊन जाताना लिफ्टमध्येही दोघांचं बोलणं सुरूच होतं. " माझं नाव एकलव्य. आपलं ? " " माफ करा ! मी माझं नाव आणि काम दुस-याला सांगायला थोडा वेळ घेतो. " " काही हरकत नाही. मी आपलं आपल्याला समजून घेण्यासाठी विचारलं. " " एकलव्याला जाणून घेण्याचा तरी कधी प्रयत्न करतोस ? " " अं... मला कळलं नाही." एकलव्य गडबडला. असा विलक्षण प्रश्न त्याला अगदी अनपेक्षित होता. " काही नाही... मी अशीच गंमत केली.... चल माझ्या मित्राचा फ्लॅट आला. " लिफ्ट्मधून बाहेर पडत तो म्हणाला. त्याने एकलव्याच्या मदतीने आपलं सामान फ्लॅटच्या दरवाजाशी ठेवलं आणि कुलूप काढलं. एकलव्याला वाटलं, तो माणूस त्याला आत येण्याचं निमंत्रण देईल. पण तो अनोळखी माणूस अनोळखीच राहिला. " एकलव्य, तुला भेटून आनंद झाला ! " एकलव्याला आत न बोलावताच त्याच्याशी हस्तांदोलन करून तो अनोळखी माणूस म्हणाला आणि त्याला जाण्याचा हलकासा इशारा केला. " मलाही आपल्याला भेटून अतिशय आनंद झाला. " एकलव्यानेही हात उंचावून त्याचा निरोप घेतला. या अनोळखी माणसाच्या अनपेक्षित व्यवहाराने एकलव्य आचंबित झाला होता. " याने तर मला बाहेरूनच घालवून दिलं." एकलव्य मनातल्या मनात बडबडला. एकलव्याचा फ्लॅट या अनोळखी माणसाच्या फ्लॅटच्या बरोबर खाली होता. आपल्या फ्लॅटकडे परतताना एकलव्याच्या मनात विचार आला, की या माणसाला अशा कही गोष्टी माहीत आहेत, की ज्यामुळे तो इतका आनंदी आणि तेजस्वी दिसतोय, पण त्याने आपलं नाव का नाही सांगितलं ? दुस-याला मदत करणं, एकलव्याच्या स्वभावातच होतं. त्या अपरिचित माणसाला मदत करून त्याला जो आनंद होत होता, असा आनंद या पूर्वी त्याला कधीच झाला नव्हता. आनंद आणि आश्चर्य यांच्या संमिश्र भावनेने भारावून तो घरी परतला।

-------------------------------------------- ---------------------------------------------

उज्ज्वला केळ्कर यांच्या अगामी अनुवादित पुस्तक ' आपले लक्ष्य ' यातून साभार

0 comments:

Post a Comment

 
MySpace Backgrounds